अण्णांचे उपोषण आणि सिंहासन चित्रपट : एक अफलातून योगायोग ( व्हिडीओ )

अण्णा हजारे यांचे उपोषण संपलेले असले तरी त्या मागील कवित्व अजुन सुरुच आहे. उपोषण करुन काय साध्य झाले इथ पासून ते अण्णांचे उपोषण व त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आल्यावर ते उपोषण मागे घेतले जाणे यातील नाट्यमय घटनांचे चर्वण होत आहे. यात सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील एक प्रसंग व अण्णांच्या उपोषणात कमालीचे साम्य असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संजय सपकाळे यांचा हा ब्लॉग.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले गेल्याने किती व काय मागण्या पदरात पडल्या याबाबतही चर्चा रंगली आहे. याबरोबरच सोशल मीडीयात सर्वांना सिंहासन चित्रपट आठवत आहे. अरुण साधू यांच्यासारख्या मातब्बर पत्रकार लेखकाने सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन सशक्त कादंबर्‍यांमधून तात्कालीन राजकीय पट विलक्षण ताकदीने साकारला होता. याचे संवाद आणि पटकथा तेवढ्याच ताकदीच्या प्रतिभावंताने म्हणजे विजय तेंडूलकरांनी लिहिलेली होती. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाची एक वेगळीच जादू असते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शक म्हणून हीच जादू यात दर्शविली आहे. या सिनेमाचा वेगळे पणा म्हणजे पहिल्यांदाच खर्‍या खुर्‍या विधानसभेत ह्याच चित्रीकरण झालं होत. विधान सभेत चालणार्‍या गमती, तिकडचं कँटीन, आमदारांची थट्टा-मस्करी, हेरगीरी, आमदार फोडण्याचे प्रकार, भोंदू हातमिळवण्या आदी अगदी यथार्थ चित्रण यात करण्यात आले होते. आता याच चित्रपटातील एक प्रसंग अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून आठवला जात आहे.

सिंहासन चित्रपटातील एक प्रसंग हा अण्णांच्या उपोषणाशी विलक्षण साधर्म्य असणारा आहे. यात एक सीन आहे. देशभक्त तात्यासाहेब जोशी हे सीमा प्रश्‍न सुटावा म्हणून प्राणांतिक उपोषणाला बसतात. साधे सुधे कपडे, ढगळ पायजमा सदरा, डोक्यावर गांधी टोपी, किरकोळ देहयष्टी, दाढीचे खुंट वाढलेलं, कपाळावर आठ्यांचे जाळे आणि डोळ्यावर चष्मा अशा अगदी कॉमन मॅन पठडीतले तात्यासाहेब माजी सैनिक असतात. ( इकडे अण्णा पण माजी सैनिक! ) तात्यांच्या पुढ्यात खांद्याला शबनम बॅग अडकवलेला एक टिपिकल पत्रकार येतो आणि तिथे लावलेले कापडी फलक वाचू लागतो, प्राणांतिक उपोषण ! सीमा प्रश्‍न ताबडतोब सुटलाच पाहिजे. यावरून तो विचारतो की, तात्या प्राणांतिक उपोषण ? म्हणजे लिंबू पाणी पिऊन की खरंच प्राणांतिक उपोषण ?. त्याच्या या प्रश्‍नाने तात्या चमकून त्याच्याकडे वर मान करून पाहतात पत्रकार बातमी घेवून पुढे निघतो. काही वेळांतच तिथे साक्षात मुख्यमंत्री जिवाजीराव येतात, हात जोडून तात्यांशी बोलतात. पुस्तकात मान खुपसून बसलेल्या तात्यांचा चेला सांगतो की तात्या थेट मुख्यमंत्री समोर आलेत. तात्या मग्रुरीत विचारतात कोण मुख्यमंत्री ?. कॅमेरामन, पोलीस असा लवाजमा घेऊन आलेले ढोंगी सीएम तात्यांच्या पुढ्यात मांडी घालून बसतात. तरीही तात्या त्यांच्याकडे बघत नाहीत. उलट खाली बसलेल्या सीएमना आपण जरा नीट बसा अशी मल्लीनाथी करतात. कावेबाज सीएम तात्यांना तुम्ही वाचन चालू ठेवा मी इथेच बसून राहतो… देवमाणसाचं दर्शन झालं आनंद वाटला.. असं ऐकवतात. ते ऐकून न ऐकल्यासारखं करत हेकट तात्या खड्या स्वरात त्यांना सीमाप्रश्‍नाची मागणी सुनावतात. कावेबाज सीएम लगेच होकार देतात. आपण आपले प्राण पणाला लावल्यावर प्रश्‍न सुटल्याशिवाय का राहिल ? असं म्हणत डोळ्यात पाणी आणतात. एकवेळ जेवण्याची आणि जमिनीवर झोपण्याची भाषा करतात आणि चलाखीने तात्यांच्या पायावर डोकं टेकवतात. त्यांना महाराष्ट्राचे भीष्म संबोधतात, ( इकडे आपले सीएम देवेद्रजी ”अण्णा देशाची संपत्ती” वगैरे अस बोललेत ! ) या वयात क्लेश करून घेतले तर माझ्या आत्म्याला क्लेश होईल असं म्हणतात. भारावलेले भोळसर तात्या या साखरपेरणीने विरघळतात. त्यांचे उपोषण रस्त्यावरून सीएमच्या बंगल्याच्या आत जाते आणि तिथेच त्याचे महत्व संपते.

मुख्यमंत्र्यांनी तात्यांच्या पायावर डोकं ठेवलेला फोटो दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्राची हेडलाईन होतो आणि उपोषण फाट्यावर मारले जाते. सीनच्या शेवटी संपादक हा फोटो दाखवत कथानायक पत्रकार दिगू टिपणीसला म्हणतात, ”मारला की नाही तुमच्या भीष्माचार्याला बगलेत !” चाणाक्ष दिगू (निळू फुले) उत्तरतो, ”हे परमेश्‍वराला सुद्धा खिशात घालतील !” सीन इथेच संपतो. अण्णांचा उपोषणाच्या प्रसंगातील विसंगतीदेखील नेमकी हीच!

सिंहासनमध्ये अरुण सरनाईक यांनी बेरक्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अजरामर केली. तर वर्तमानात देवेंद्र फडणवीस यांनी अरुण सरनाईकांना मस्त वठविले. सिंहासन मध्ये मुख्यमंत्री जिवाजीराव यांनी तात्यांसमोर जाहिर लोटांगण घातले होते येथे देवेंद्रजींनी बंद केबीनमध्ये लोटांगण घातले. पण भूमिका परफेक्ट.. अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने १९८० नंतर ४० वर्षानंतर सत्ताधार्‍यांचे सिहांसन वाचवण्याची कला तीच आहे हे लक्षात आले. अर्थात, यानिमित्त सिंहासन या चित्रपटाची महत्तादेखील पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

:- संजय सपकाळे

व्हिडीओमध्ये पहा : सिंहासन चित्रपटातील प्रसंग.

Add Comment

Protected Content