अनिलराज पाटील यांची “द मीटिंग ऑफ बर्ड” चित्रकलेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार ओळख !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार अनिल राज पुनमचंद पाटील यांची कला पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली आहे. तामिळनाडूतील मदुराई शहरात प्रथमच सुरू होणाऱ्या “अँड्रील आर्ट हरिटेज गॅलरी”च्या राज्यस्तरीय ‘आर्ट हंट’ चित्र प्रदर्शन व स्पर्धेत अनिलराज यांच्या “द मीटिंग ऑफ बर्ड” या चित्राची निवड झाली आहे.

हे चित्र प्रदर्शन ७ दिवस चालणार असून, कलाप्रेमींसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या चित्रात श्री गणेश एका पक्ष्याशी हितगुज करताना दाखवले गेले आहे. पेन आणि इंकच्या माध्यमातून साकारलेले हे चित्र नजरेत भरणारे असून, त्याची रचना आणि कल्पनाशक्ती यामुळे ते रसिकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

याचबरोबर, यूएसएस्थित ‘CEV Online Art Gallery’ ने जागतिक कला दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल एक्सप्रेशन टू – 2D वर थ्रीडी’ या ऑनलाईन ग्रुप एक्झिबिशनमध्येही अनिलराज यांच्या एकूण तीन चित्रांचा समावेश झाला आहे. या प्रदर्शनात “द मीटिंग ऑफ बर्ड”, “जर्नी ऑफ लाईफ” आणि “शिवरुद्र पार्ट टू” ही चित्रे १५ एप्रिल ते ३० मे दरम्यान ऑनलाईन गॅलरीच्या संकेतस्थळावर जगभरातील कलारसिकांसाठी खुले राहणार आहेत.

या प्रदर्शनाचे आयोजक आणि गॅलरीचे संस्थापक शंटेल फुल्स यांनी अनिलराज यांना मेलद्वारे या निवडीबाबत शुभेच्छा दिल्या असून, हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे महत्त्वाचे प्रदर्शन असल्याचेही सांगितले आहे. अनिलराज हे सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. या यशाचे श्रेय ते आपले गुरुजन, मार्गदर्शक आणि कलेविषयीची निष्ठा यांना देतात.

Protected Content