केळीच्या खोडाने वाचविले प्राण : महिलेच्या धाडसाने सर्वच थक्क !

अमळनेर-गजानन पाटील | जीवनाचा धागा पक्का असला तरी कितीही विपरीत स्थिती आली तरी मृत्यूला हुलकावणी देता येते. अशाच प्रकारे धाडसाला दैवाची साथ मिळाल्याने चोपडा तालुक्यातील महिला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतली आहे.

अस म्हणतात की,देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणार्‍या तापी नदीत झोकून देणार्‍या लताबाई कोळी यांच्या बाबतीत सर्वांनाच आलेला आहे.

बिबट्या दिसताच प्राण वाचविण्याची धडपड

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ( वय ५० ) या शुक्रवारी तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या.तसा चोपडा तालुक्यातील पहाडी क्षेत्रामुळे हिंस्त्र प्राण्यांचा वावर हा निश्चित.अशातच लताबाई शेंगा तोडत असतांना त्यांना बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागल्याचे दिसले. बिबट्या आपली देखील शिकार करेल या भितीने त्यांनी जीवाच्या अकांताने धावण्यास प्रारंभ केला. त्यांच्या शेताला लागूनच खालच्या बाजूस दुथडी भरून वाहणारी तापी नदी होती. एकीकडे बिबट्याची धास्ती तर दुसरीकडे रौद्रभीषण स्वरूपातील तापी ! मात्र जीव वाचवण्यासाठी लताबाईंनी थेट तापी नदीत उडी मारली !

धाडसाने तापीत मारली उडी !

लताबाई कोळी यांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट तापी नदीत उडी मारली ! नदीकाठी गाव असल्याने साहजिकच त्यांना थोडे पोहता येत होते. मात्र प्रचंड वेगाने वाहणार्‍या तापीतून जीव वाचणे देखील तितके सोपे नव्हते. त्यांनी बराच वेळ पोहण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांच्या हाताला तरंगणारे केळीचे एक खोड लागले. तेच खोड त्यांना जीवदान देणारे ठरले.

आपबिती कथन करतांना अश्रू अनावर !

लताबाई कोळी या तापी नदीच्या पात्रातून खालील बाजूस सुमारे साठ ते ७० किलोमीटरपर्यंत पुढे गेल्या. यात, पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसर्‍या दिवशी नाविकाना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. नावाड्यांनी तातडीने त्यांना पात्राबाहेर काढले. यावेळी आपबिती कथन करतांना लताबाईंना अश्रू अनावर झाले. किमान १५ ते १६ तास त्या मृत्यूशी झुंजत होत्या. अखेर केळीच्या खोडामुळे त्यांना जीवदान मिळाले. लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले.त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारार्थ अमळनेर ला हलीवले व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना पाचारण करून स्वाधीन केले.

आपबिती कथन करतांना लताबाईंच्या भावनांचा बांध फुटला !

परिसरातून धाडसाचे कौतुक

दुथडी भरून वाहणार्‍या तापी नदीतून पोहायचे म्हटल्यास भले भले टरकतात. हे काम फारसे सोपे नाही. मात्र रौद्र रूपातील तापी नदीत पोहून लताबाईंनी अतिशय धाडसाने आणि अर्थानच नशिबाची साथ मिळाल्याने आपले प्राण वाचविले. आता त्यांच्या धाडसाची परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

Protected Content