चोपडा नगरपालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा

चोपडा प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेण्यात आली असून राज्यात पहिल्यांदाच अशी सभा आयोजित केल्याचा दावा करण्यात आला आहे.

येथील नगर परिषदेची स्थायी समिती सभा ६ रोजी दुपारी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी ऑनलाइन सभेविषयी सर्व सदस्यांच्या शंकांचे मुख्याधिकारी यांनी निरसन केले. या सभेच्या विषय पत्रिकेवर २९ विषय होते. सभेची विषय पत्रिका आधिच सर्व सदस्यांना निर्गमित करण्यात आली होती. सर्व विषयांसंदर्भात सदस्यांकडून सूचित केल्यानुसार सूचना, उपसूचना प्राप्त झाल्या. सभा सुरु असताना विषयनिहाय वाचन करण्यात आले. प्रत्येक विषयाची पार्श्‍वभूमी स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर सदस्यांकडून प्राप्त विषयासंबंधी सूचनेचे वाचन केले. प्रत्येक विषयाच्या सूचनेवर मतदान घेण्यात आले. यात २९ विषयांपैकी काही विषयांना सर्वानुमते तर काहींना बहुमताने मंजुरी दिली. शेवटी मुख्याधिकारी व सदस्यांनी सभेविषयी सकारात्मक अभिप्राय मांडला.

या सभेमध्ये सार्वजनिक शौचालयांची साफसफाई, बांधकाम विभागाचे वार्षिक दर कराराची दहा कामे, रस्त्याची तीन महत्वाची कामांना मंजुरी, दलित वस्ती योजनेतील एक रस्ता, नागरी दलितेतर सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे एक काम, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील तीन कामे, अशा वेगवेगळ्या २९ विकास कामांना ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, सदस्य हितेंद्र देशमुख, सुरेखा माळी, सीमा श्रावगी, रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, किशोर चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, उपमुख्याधिकारी पूनम राणे, सभा अधीक्षक नीलेश ठाकूर, कार्यालय अधीक्षक रवींद्र जाधव, बांधकाम अभियंता सचिन गवांदे, स्वच्छता निरीक्षक व्ही. के. पाटील, संगणक अभियंता रोहित सुरसे, पाणीपुरवठा अभियंता पल्लवी घिंवदे, भांडारपाल भिकन पारधी, कर निरीक्षक रमेश बहिरम, विद्युत अभियंता मंगेश जंगले, लेखापाल संतोष पुणेकर, गणेश पाठक आदी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सभा घेणारी चोपडा पालिका पहिली ठरली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content