नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तब्बल ४३ लाखात फसवणूक

चोपडा प्रतिनिधी | नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने शहरातील एकाजणाची तब्बल ४३ लाखाची फसवणूक झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चोपडा शहर पोलीसांत उत्तर प्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रत्नदिप नगर येथील रहिवासी अनिल पाटील यांच्या नातेवाईकांना ‘भारतीय खाद्य निगम’ येथे नोकरी लावून देतो, अशी बतावणी करुन तब्बल ४३ लाखांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चोपडा न्यायालयात अनिल संतोष पाटील रा. रत्नदिप नगर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्राप्त आदेशान्वये चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “चोपडा शहरातील रत्नदिप नगर येथील रहिवासी फिर्यादी अनिल संतोष पाटील यांच्या नातेवाईकांना आरोपी रुद्रप्रताप विजयसिंग, दिनेश रामेश्वरसिंह व मोना दिनेशसिंह यांनी भारतीय खाद्य निगमात आपली मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहे. त्यामुळे आम्ही कुणालाही नोकरीला लावून देवू शकतो अशी बतावणी करुन तब्बल ४३ लाख रुपयांची मागणी केली व सदर रक्कम वेगवेगळ्या क्रमांकांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर रक्कम रु. ४३ लाख जमा केली. संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सुद्धा भारतीय खाद्य निगममध्ये संबंधितांना नोकरी लावून न दिल्यामुळे आरोपींकडे दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक व विश्वासघात झाला असे लक्षात आल्याने फिर्यादी अनिल संतोष पाटील यांनी मा. चोपडा न्यायालय येथे तक्रार दाखल केली.

त्याच अनुषंगाने उत्तर प्रदेशातील तिघांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content