अमळनेर प्रतिनिधी । नगरपालिकेने फलक काढण्यावरून झालेल्या वादावर आमदार अनिल पाटील यांच्या मध्यस्थीने अखेा पडदा पडला आहे. यात दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखविल्याने हा वाद संपुष्टात आला आहे.
नगरपालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जैन समाजाचे बॅनर काढल्याचे प्रकरण वादाच्या भोवर्यात सापडले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर उपमुख्याधिकारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. मात्र यातून तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पुढाकार घेतला.
आमदार अनिल पाटील निवासस्थानी मंगळवारी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तक्रारदार संजय जैन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यात गैरसमज दूर करण्यात आले. दोन्ही गटांचा सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे वाद मिटल्याची लेखी ग्वाही दोन्ही गटांनी दिली. प्रभारी मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड व अमळनेर जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष मदनलाल जैन यांनी नागरिकांनी आता हा वाद न वाढविता शांतता बाळगण्याचे आवाहन केले.