आ. अनिल पाटलांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांना दिला धीर !

अमळनेर प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या वेदना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी थेट बांधावर जाऊन जाणून घेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

अमळनेर मतदार संघात २ ऑक्टोबर पर्यंत सर्वदूर अतिवृष्टी व अवकाळी यामुळे कृषि क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनुषंगाने आमदार अनिल पाटील यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांनी धीर दिला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली असून या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहले आहे.

अमळनेर मतदारसंघातील शिरूड,भरवस,पातोंडा,नगाव, मारवड,वावडे,अमळगाव,अमळनेर,शेळावे,व बहादरपूर या सर्वच १० ही मंडळात अतिवृष्टी तर कुठे अवकाळीमुळे शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.काही भागात बांधावर जाऊन आमदारांनी नुकसानीचा आढावा घेतला.सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

या अनुषंगाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला यासाठी आमदार अनिल पाटील यांनी कृषिमंत्री दादाभुसे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवार,पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मतदारसंघातील नुकसानीची माहिती दिली, संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील असे मंत्र्यांनी सांगितल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. आमदार पाटील सोमवारी मुंबई येथे कृषी, मदत व पुनर्वसन,महसूल या मंत्र्यांची भेट घेऊन अतिवृष्टी व अवकाळीमुळे अमळनेर मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव,धुळे,नंदुरबार या भागातील शेतीचा नुकसाणीबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Protected Content