खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी जितेंद्र झाबक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील खान्देश शिक्षण मंडळात विद्यमान सत्ताधार्‍यांनी सत्ता कायम राखण्यात यश मिळविले असून यात अध्यक्षपदी जितेंद्र झाबक तर उपाध्यक्षपदी जितेंद्र देशमुख व माधुरी पाटील यांनी विजय संपादन केला आहे.

खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीनंतर याच्या निकालाबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता होती. या अनुषंगाने खान्देश शिक्षण मंडळाची मतमोजणी रविवारी इंदिरा गांधी भवन येथे झाली. त्यात आठपैकी आशीर्वाद पॅनलचे सहा, तर सहकार पॅनलचे दोन संचालक विजयी झाले. यात अध्यक्षपदासाठी किसन देवराम पाटील (३७३), विक्रम शहा (५८५) आणि जितेंद्र झाबक (१७७९) यांच्यात तिरंगी लढत झाली, त्यात झाबक विजयी झाले. अध्यक्षपदाच्या लढतीत एकूण २३६ मते बाद झाली. विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे (१८१७), नगीन लोढा (९००) आणि संतोष पाटील (७२९) यांच्यातील लढतीत वसुंधरा लांडगे विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी जितेंद्र देशमुख (१७९८) आणि माधुरी पाटील (१७४१) यांची वर्णी लागली. संदीप जैन (१४०९) तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

या वेळी निवडणूक समिती अध्यक्ष अनिल कदम, चिटणीस प्रा. ए. बी. जैन, निवडणूक उपसमिती चेअरमन पंडित चौधरी, डॉ.बी.आर.बाविस्कर, दिनेश नाईक, मनोहर महाजन, प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे यांनी काम पाहिले.

दरम्यान, या निवडणुकीत माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील व जितेंद्र जैन या दोन विद्यमान संचालकांना पराभवाचा धक्का बसला. तर डॉ.अनिल शिंदे व उद्योगपती विनोद पाटील यांना संधी मिळालेली आहे.

Protected Content