ब्रेकींग : राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

पुणे- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची घोषणा आज राज्य शिक्षण मंडळाने आज केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावरून संभ्रमाचे वातावरण असतांना आज राज्य शिक्षण मंडळाने दोन्ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.

परीक्षेचा कालावधी आणि स्वरुप निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत होणार आहेत. ३१ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल असे आज जाहीर करण्यात आले आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे. दरम्यान दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी १४ लाक ७२ हजार ५६५ आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं.

Protected Content