धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने श्रीकृष्ण नगरातील ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सागर अरूण सरोदे (वय-३०) रा. श्रीकृष्ण नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर सरोदे हा तरूण आपल्या आईवडील आणि मोठ्या भावासह श्रीकृष्ण नगरात वास्तव्याला आहे. दोन्ही भाऊ शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजीपाला विक्री करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. सागर सरोदे हा गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे घरात काहीही न सांगता निघून गेला होता. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळील रेल्वे रूळावर धावत्‍या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे सागरची ओळख रेल्वे पोलीसांकडून ओळख पटविण्यात आली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता तर नातेवाईक आणि मित्रमंडळींची मोठी गर्दी जमली होती. मयताच्या पश्चात आई उषाबाई, वडील अरूण नथ्थू सरोदे, मोठा भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामराय इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content