रेमडेसिविर प्रकरणी माजी आमदारांवर होणार कारवाई !

अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत रेमडेसिवीर इंजेक्शनची गैर मार्गाने विक्री केल्या प्रकरणी माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. आ. अनिल भाईदास पाटील यांनी याबाबत तक्रार केली होती.

याबाबत वृत्त असे की, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार आणि अमळनेर येथे ब्रुक फार्माचे रेमडेसिविर इंजेक्शन सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले होते. या अनुषंगाने त्यांनी गैरमार्गाने याची विक्री केल्याचा आरोप करून चौधरी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी एप्रिल महिन्यात अन्न व औषध मंत्र्यांकडे शिरीष चौधरी यांच्या इंजेक्शन विक्रीबाबत लेखी तक्रार केली होती. मंत्र्यांनी आपल्या खात्यातील सहआयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नंदुरबारचे जिल्हाधिकारी तथा नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी या प्रकरणाची चौकशी करून सहआयुक्तांना अहवाल पाठवला होता. त्या अहवालात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर बेकायदा इंजेक्शनची खरेदी, साठवणूक, विक्री आणि वाटप केल्याचा ठपका ठेवला आहे.

माजी आमदार शिरीष…औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४०च्या कलम २७ आणि कलम १८ आणि या अधिनियमांतर्गत नियम १९४५ नुसार औषधाची खरेदी, साठा, विक्री आणि वाटप करण्याचा अधिकार केवळ औषध विक्री परवानाधारकाला आहे. मात्र, हिरा फाउंडेशनमार्फत शिरीष चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनाचा औषध विक्री परवाना नसतानाही रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी, साठा आणि विक्री केली. त्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायदा आणि नियमावलीतील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

Protected Content