Home Cities अमळनेर पाडळसरे धरण प्रकल्पाला गती देण्याची मागणी ; जनआंदोलन समितीचे निवेदन

पाडळसरे धरण प्रकल्पाला गती देण्याची मागणी ; जनआंदोलन समितीचे निवेदन

0
14


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी निम्न तापी प्रकल्पाला (पाडळसरे धरण) गती देण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तब्बल अडीच दशकांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करून धरणात लवकरात लवकर पाणी अडवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्याचे जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले हे निम्न तापी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसरे येथे आले होते. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यानंतर पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, प्रा. सुनील पाटील, पदाधिकारी रविंद्र पाटील, नगरसेवक प्रताप साळी, प्रा. भरतसिंग परदेशी आदींनी सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले की, तापी नदीवर पाडळसरे येथे निम्न तापी प्रकल्पाची पायाभरणी सन १९९९ मध्ये झाली होती. मात्र तत्कालीन राजकीय अनास्था, अपुरा निधी आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प गेल्या अडीच दशकांपासून संथ गतीने सुरू आहे. पाडळसरे धरणाच्या प्रस्तावित लाभक्षेत्रातील मोठा परिसर हा वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि परिसराच्या विकासासाठी धरणाच्या कामाला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. धरणात लवकर पाणी साठवण्यासाठी मुख्य बांधकामासोबतच पुनर्वसनाची कामेही जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

धरणाच्या ठिकाणी स्वतंत्र प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावे, जेणेकरून शेतकरी व विस्थापित नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर तातडीने सोडवता येतील, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अनियमिततेमुळे शासनाकडून उपलब्ध होणारा निधी योग्य प्रकारे वापरला जात नसल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले. बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन आणि उपसा सिंचन योजनेची कामे एकाच वेळी वेगाने पूर्ण करून प्रकल्प मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जलसंपदा विभागातील सचिव स्तरावरील अधिकारी प्रथमच पाडळसरे प्रकल्पाच्या पाहणीसाठी आल्याबद्दल जनआंदोलन समितीने एकनाथ डवले यांचे आभार मानले.

यावेळी समितीचे प्रसाद चौधरी, सुशील भोईटे, गणेश कुंवर, दीपक भोई, ॲड. विजय देवरे, एन. के. पाटील, ज्ञानेश्वर वारुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे अभियंता वाय. एम. कडलग यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते. पाडळसरे धरण जनआंदोलन समिती गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी यासाठी समितीचा संघर्ष सुरू आहे.


Protected Content

Play sound