Home उद्योग स्वयंदीप अपंग विकास संस्थेला श्री व श्रीमती धिवरे यांची भेट 

स्वयंदीप अपंग विकास संस्थेला श्री व श्रीमती धिवरे यांची भेट 

0
11


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या उद्दाम स्वयंदीप अपंग विकास बहुद्देशीय संस्था, चाळीसगाव येथे आज रविवारी श्री व श्रीमती धिवरे यांनी भेट देत संस्थेतील मुलींशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेत दिव्यांग मुलींच्या संघर्षमय प्रवासाला जाणून घेत त्यांचे मनोबल वाढवले.

संस्थेच्या संस्थापक श्रीमती मीनाक्षी निकम आणि संस्थेतील सर्व मुलींशी श्री व श्रीमती धिवरे यांनी मनमोकळा संवाद साधला. मुलींच्या जीवनातील अडचणी, त्यांचा संघर्ष, आत्मनिर्भर होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. संस्थेतील मुलींनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन दिले.

यावेळी संस्थेने तयार केलेल्या वस्तूंना भविष्यात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ऑर्डर्स कशा मिळवता येतील, याबाबतही चर्चा करण्यात आली. दिव्यांग मुलींच्या मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारच्या संवेदनशील भेटींमुळे संस्थेतील मुलांचे मनोबल वाढते. तसेच समाजातील विविध घटकांमध्ये दिव्यांग व्यक्तींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. स्थानिक पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्येही अशा संस्थांबाबत संवेदनशीलता निर्माण होऊन संस्थेतील मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळण्यास मदत होते.

स्वयंदीप संस्थेतील दिनचर्याही शिस्त, स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढविणाऱ्या पद्धतीने आखण्यात आली आहे. सकाळी ५.३० वाजता दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर प्रातर्विधी, अंघोळ, योग व व्यायाम, सकाळची प्रार्थना, नाश्ता आणि वाचन यानंतर सकाळी ९ वाजता कामाला सुरुवात केली जाते. संस्थेतील मुली विविध कौशल्याधारित कामांमध्ये सहभागी होतात. सकाळी ११ ते ११.३० भोजन, त्यानंतर थोडा विरंगुळा आणि दुपारी १२ ते ३.३० या वेळेत काम केले जाते. दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा ४.३० ते ६.३० या वेळेत काम केले जाते. दिवसभरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी संवाद, गप्पागोष्टी, रात्रीचे भोजन, मनोरंजन व खेळ यासाठी वेळ दिला जातो.

रात्री ९ वाजता प्रार्थना करून ९.३० वाजता झोपण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या नियोजनबद्ध दिनचर्येमुळे संस्थेतील मुलींमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण होत आहे. ‘शिस्त, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि आनंदी जीवन’ हेच स्वयंदीप संस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य असून, दिव्यांग मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.


Protected Content

Play sound