अमळनेरातील कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीए : सलग तिसरी कारवाई

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका सराईत गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले असून ही या प्रकारची सलग तिसरी कारवाई असल्याने गुन्हेगारी विश्‍वात खळबळ उडाली आहे.

विशाल विजय सोनवणे या सराईत गुन्हेगाराच्या विरोधात एम. पी. डी. ए. कारवाई आज रोजी करण्यात आली असून त्यास नागपूर सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. विशाल याच्यावर आज पावतो एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात व अमळनेर मध्ये दाखल आहेत. तसेच अनेक अदखलपात्र अपराध अमळनेर पोलीस स्टेशनला देखील दाखल आहेत.

विशाल सोनवणे यांच्यावर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने मोटर सायकल चोरी करणे, महिलेचा विनयभंग करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्यासारखे जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, लोखंडी फायटर मारून पिस्टल कपाळाला लावून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ३ गुन्हे देखील दाखल आहेत.

दरम्यान, विशाल सोनवणे याला हद्दपार देखील करण्यात आले होते. तथापि, तो हद्दपार करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. यामुळे आता त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात आल्याने तालुक्यातील जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यात तीन गुन्हेगारांवर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईत प्रामुख्याने पोलीस अंमलदार किशोर पाटील, शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे व महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती अक्षदा इंगळे तसेच सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय वना पाटील चालक पोलीस हवालदार मधुकर पाटील चालक पोलीस शिपाई सुनील पाटील आणि संदेश पाटील हितेश चिंचोरे मिलिंद भामरे या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांची मदत व पाठपुरावा खूप मोलाचा आहे. तसेच त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राज कुमार; अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. परिसरातून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content