मोर्चानंतर कोण आपले आणि कोण बंडखोर हे समोर येईल – संजय सावंत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘आक्रोश मोर्चानंतर कोण आपले आणि कोण बंडखोर हे समोर येईल. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,’ असे संजय सावंत म्हणाले. शनिवार, दि.२ जुलै रोजी दुपारी २ वाजता चित्रा चौक ते अजिंठा चौफुली असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी पत्रकार परिषदेत आज संवाद साधतांना ते बोलत होते.

राज्यातील घडामोडी आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी ते संपर्क मेळावा घेत संवाद साधत आहे. जळगावात बुधवार घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी “बंडखोरांच्या गटात जळगाव जिल्ह्यातील ५ आमदार सामील झाले असून कार्यकर्ते मात्र अजूनही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे. जिल्ह्यातील कोण शिवसेनेसोबत आहे हे तपासण्यासाठी शनिवारी जळगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, मतीन सैय्यद, मानसिंग सोनवणे, फरीद शेख, शोएब खाटीक आदींची उपस्थिती होती.

संजय सावंत म्हणाले की, “कुटुंब प्रमुखला आपले घर तुटावे असे कधीही वाटत नाही. उद्धव ठाकरेंना सत्तेचा आणि पदाचा मोह नव्हता म्हणून त्यांनी वर्षा बंगला सोडला. आपले घर शाबूत राहावे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे. जे बंडखोर बाहेर पडले त्यांना पदाचा आणि सत्तेचा मोह आहे म्हणून त्यांनी अजूनपर्यंत समोर येत सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा केली नाही. असे ते म्हणाले. चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लता सोनवणे यांना उमेदवारी देताना आज बंडखोरांचे नेतृत्व करणारे जिल्ह्यातील पुढारी माधुरी पाटील यांच्या नावाची शिफारस करीत होते. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आ.चंद्रकांत सोनवणे व शामकांत सोनवणे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. जात प्रमाणपत्र अवैधतेचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी दुपारी २ वाजता चित्रा चौक ते अजिंठा चौफुली असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आज पक्षाशी बंडखोरी करून स्वतःला दिग्गज समजणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांनी राजीनामा देऊन दाखवावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

 

Protected Content