डॉ पानतावणेंनी अस्मितादर्शच्या माध्यमातून वंचितांची चळवळ समाजमनांत रुजविली – जयसिंग वाघ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वंचितांच्या चळवळीला अनुभवातून सिद्ध करीत अस्मितादर्श आणि साहित्यलेखनातून कालकथित पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी नवोदितांच्या लेखणीत आणि समाजमनात चळवळ रुजवत भारतीय साहित्यांत स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे उद्गार साहित्यिक व ज्येष्ठ समीक्षक जयसिंग वाघ यांनी काढले.

 

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे मंगळवारी (28 जून) सॅन होजे येथील विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अस्मितादर्शकार पद्मश्री, कालकथित डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. कार्यक्रम पिंप्राळा उपनगरातील श्रीरत्न कॉलनी भागातील अथर्व पब्लिकेशन्सच्या कार्यालयात सायंकाळी झाला. भुसावळ येथील पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाचे पदवी-पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. के. के. अहिरे अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ समीक्षक जयसिंग वाघ, तर मुख्य अतिथी म्हणून सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, महापालिकेचे सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी. एम. अडकमोल, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी यांची उपस्थिती होती.
श्री. वाघ म्हणाले की, अस्मितादर्श परिवाराची पताका विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. पानतावणे सरांनी जगभर पसरविली. आपल्या आयुष्यभर त्यांनी आंबेडकरी विचारधारा जोपासत नवनव्या लेखकांना लेखणीसाठी प्रोत्साहित करीत अस्मितादर्श संमेलनातून एक नवा विचार सदोदित तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
प्रा. डॉ. के.के. अहिरे म्हणाले की, अस्मितादर्श आणि वंचित समाजव्यवस्था हे एक समीकरण असल्याचे आणि त्या समीकरणातून नव्या पिढीची जडणघडण होत लेखणीच्या माध्यमातून नव्या पिढीतल्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याला उजागर करीत अस्मितादर्श या त्रैमासिकातून डॉ. पानतावणे सरांना एक नवा इतिहास घडवीत प्रस्थापित समाजव्यवस्थेला चपराक देत आपल्या सर्वोत्तम अशा विचारांतून, लेखणीतून समाजमन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दृढमल करण्याचे महत्त्वाचे कार्य केल्याचे दिसून येते.
कार्यक्रमाला , प्रा. डॉ. सत्यजित साळवे, मंगल बी. पाटील, बापू पानपाटील, विजय लुल्हे, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडे, कलाशिक्षक सुनील दाभाडे, शिवराम शिरसाट, भय्यासाहेब देवरे, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी आदी उपस्थित होते. बापू पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय लुल्हे यांनी प्रास्ताविक केले. भय्यासाहेब देवरे यांनी आभार मानले.

Protected Content