विद्यार्थ्यांनो देशाला बलशाली बनवा – ब्रह्माकुमार भगवान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे संस्कार रुजविणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे शाळा. विद्यार्थ्यांनो नैतिक मूल्य अंगीकार करुन कुटुंब समाज व देशाला बलशाली बनवा, असे आवाहन ब्रह्माकुमार  भगवान  यांनी भगीरथ इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना केले.

मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे संस्कार रुजविणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे शाळा. उद्याच्या भारताचे आधारस्तंभ शाळेत घडवले जात असतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान शाळेतून मिळते पण विवेकबुद्धी वृद्धिंगत करण्यासाठी नैतिक  मूल्यांची आवश्यकता आहे. नेमका या बाबीचा अभाव आज जाणवत असल्याने युवावर्ग व्यसनी होऊन भरकटत चालला आहे. याला कारण भारतातील प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीत शिकविले जाणारे नैतिक मूल्यांचे धडे आजच्या शिक्षकांकडून अभावानेच विद्यार्थ्यांना दिले जाताना दिसून येतात. असे प्रतिपादन ब्रह्माकुमार भगवान यांनी केले

भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे माउंट आबू येथून ब्रह्माकुमारी अंतरराष्ट्रीय मुख्यालयातून आलेले  ब्रह्माकुमार भगवान यांनी विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्य जीवनात आचरणात आणून भावी सुदृढ राष्ट्राची निर्मिती करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यासाठी त्यांनी कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात सहजतेने नैतिक मूल्यांची पेरणी केली. बेशिस्त दुर्गुणी वर्तन आणि नैतिक मूल्याधारित सद्गुणी वर्तन या दोन्ही बाजू मांडून त्यापैकी कोणते जीवन निवडाल? याबाबत विद्यार्थ्यात जागृती निर्माण करून नैतिक मुल्यांचे आचरण करा, दुर्गुण सोडून गुणांची कास धरा, निर्व्यसनी रहा याबाबत विविध रूप कथांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

तसेच विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली एकाग्रता साध्य करण्यासाठी त्यांनी राजयोग (मेडिटेशन) चा अभ्यास ही विद्यार्थ्यांना कळविला व विज्ञान सोबत अध्यात्माची (पर्यायाने नैतिक मूल्यांची) कास धरून स्वतःचे व्यक्तिमत्व संतुलित बनवा, यातून स्व परिवर्तन साधेल. हेच स्व परिवर्तन श्रेष्ठ विश्व परिवर्तनाची नांदी ठरेल असे प्रतिपादित करून विद्यार्थ्यांच्या मनात नैतिक मूल्य रुजविण्यासाठीचा आत्मविश्वास जागविला. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक सुदाम निकम, ज्येष्ठ शिक्षक एस. डी. भिरुड, तसेच पंकज पाटील, शेखर पाटील,  ब्रह्माकुमारी निकिता दीदी उपस्थित होते. ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय मनीषा दीदींनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले.

Protected Content