अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि सात्त्विक आहाराची सवय अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले. ते अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
शनिवार, दि. १८ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. हेमंतकुमार भदाणे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून तणावाचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट करत, सकारात्मक विचारसरणी, संतुलित आहार आणि नियमित जीवनशैली यांचा अवलंब केल्यास तणावावर प्रभावीपणे मात करता येते, असे सांगितले. वाढत्या फास्टफूड संस्कृतीमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत त्यांनी सात्त्विक आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व तसेच मंदिरामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत मंदिरातील धार्मिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्री पाटील, श्रीमती प्रीती देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. वर्षा भदाणे, पाचोरा येथील सीडीपीओ संत मॅडम, जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अधिकारी तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती प्रीती देवरे यांनी केले. कार्यशाळेत सहभागी अधिकाऱ्यांनी मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.



