Home Cities जळगाव जळगावात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; ठाकूर समाज कार्यालयात अभिवादन

जळगावात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; ठाकूर समाज कार्यालयात अभिवादन

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  आदिवासी समाजाचे महानायक, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देणारे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथील ठाकूर समाज कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ बांधव, महिला वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीसूर्यास विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून  भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. ‘जल, जंगल आणि जमीन’ या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी बिरसा मुंडा यांनी बालवयातच आपल्या कार्याची सुरुवात केली होती, असे सांगत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ तीर-कमान आणि भाल्यासारख्या पारंपरिक शस्त्रांच्या बळावर इंग्रज सत्तेला दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. त्यांच्या शौर्याची, त्यागाची आणि अन्यायाविरोधात लढण्याच्या जिद्दीची अनेक प्रेरणादायी उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणातून मांडली. तसेच समाजासमोरील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि अन्यायकारक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परस्परांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. समाजाची एकजूट हीच आपली प्रगतीची खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत, आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रत्येкаसाठी दीपस्तंभ असल्याचे सांगितले. समाजावर होत असलेल्या अन्यायकारक घटनांना विरोध करण्यासाठी समाजबांधवांनी केवळ चर्चा न करता संघटितपणे आवाज उठवावा आणि एकमेकांच्या पाठीशी उभी राहून सहकार्याची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सरिता दौलत ठाकूर यांनीही आपल्या मनोगतात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. महिलांनी एकत्र येऊन लघुउद्योग, स्वयंरोजगार तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन रुपेश ठाकूर यांनी केले होते, तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गोपाल ठाकूर, निलेश ठाकूर आणि सागर ठाकूर यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह सुदाम पं. सौंदाणे, संजय बन्सी ठाकूर, गणेश अहिरे, प्रभाकर मोरे, सूर्यभान ठाकूर, संजय साळुंखे, सुभाष चव्हाण (इंजि.), डॉ. दीपक ठाकूर, अनिल प्र. ठाकूर, पुरुषोत्तम सोनवणे (इंजि.), समाधान चव्हाण, विजय ठाकूर, रुपेश ठाकूर, रवींद्र सोनवणे, गोपाल अहिरे, हितेश ठाकूर, निलेश ठाकूर व सागर ठाकूर आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content

Play sound