Home Cities जळगाव उघड्यावर मांस विक्रीविरोधात महापौरांचा दणका; प्रशासनाला कारवाईचे आदेश

उघड्यावर मांस विक्रीविरोधात महापौरांचा दणका; प्रशासनाला कारवाईचे आदेश

0
42

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या महासभेतील ठरावाची अंमलबजावणी झाली की नाही, याचा जाब आता महापौर दीपमाला मनोज काळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. या संदर्भात महापौरांनी महानगरपालिकेच्या उपायुक्तांना पत्र देत आजपर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरील कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मागील महासभेत नगरसेवक आणि नागरिकांच्या मागणीनुसार उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या माध्यमातून उघड्यावर मांस विक्रीला आळा घालण्यासाठी धोरणही निश्चित करण्यात आले होते. मात्र, या निर्णयानंतर संबंधित विभागाने प्रत्यक्षात किती कार्यवाही केली, याबाबत माहिती घेण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेतला आहे.

महापौरांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपायुक्त (सामान्य प्रशासन), जळगाव शहर महानगरपालिका यांना अधिकृत पत्र पाठविले आहे. त्यामध्ये मंजूर ठरावाच्या अनुषंगाने आजपर्यंत किती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, किती विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि उघड्यावर मांस विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या, याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

तसेच, महासभेने ठराव मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नसेल, तर संबंधित विभागाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करून या प्रकाराला आळा घालण्याची सूचना महापौरांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने महापौर कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन कोणती पावले उचलते आणि प्रत्यक्षात किती विक्रेत्यांवर कारवाई होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound