Home Cities जळगाव विशेष लोक अदालतीत पक्षकारांना दिलासा; चेक बाऊन्सची 85 प्रकरणे मिटली

विशेष लोक अदालतीत पक्षकारांना दिलासा; चेक बाऊन्सची 85 प्रकरणे मिटली

0
41

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोक अदालतीला उल्लेखनीय यश मिळाले आहे. जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित या विशेष लोक अदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली एकूण 85 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रक्रियेद्वारे एकूण ₹1,87,72,506 रुपयांची वसुली करण्यात आली असून, पक्षकारांना जलद आणि सुलभ न्याय मिळण्यास मोठी मदत झाली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 18 जुलै  रोजी जळगाव जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, संबंधित पक्षकार, बँका आणि वित्तीय संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

या विशेष लोक अदालतीचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. विशेष लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले. न्यायालयीन वाद तडजोडीने आणि कमी वेळेत निकाली काढण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे न्यायालयावरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत झाली.

या विशेष लोक अदालतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीशांनी सक्रिय सहकार्य केले. विशेषतः एस. व्ही. खोंगल (जिल्हा न्यायाधीश-1), आर. एस. साळगांवकर (जिल्हा न्यायाधीश-6), एस. व्ही. मोरे, आर. एस. मोरे, साक्षी डी. खरे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सागर एस. चित्रे, सचिव ॲड. विरेंद्र एम. पाटील, पॅनल न्यायाधीश एम. एम. निकम तसेच पॅनल सदस्य ॲड. वैशाली डी. बोरसे आणि ॲड. मंजुळा मुंदडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय एम. पी. कोठावदे (प्रभारी प्रबंधक), ललित चौधरी (वरिष्ठ लिपीक/प्रोटोकॉल) तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधीक्षक सौ. ए. सी. भट यांच्यासह आर. के. पाटील, प्रमोद बी. ठाकरे, संतोष एस. तायडे, पवन पाटील, ललित कुलकर्णी, सचिन पवार आणि जितेंद्र भोळे यांनी विशेष परिश्रम घेत ही लोक अदालत यशस्वी केली.

 


Protected Content

Play sound