जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आयोजित प्राध्यापक विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापकांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या यशामुळे संस्थेच्या मेडिकल एज्युकेशन युनिटला अधिक बळ मिळणार असून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय येथे नुकताच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्राध्यापक विकास कार्यक्रमांतर्गत ‘अॅडव्हान्स कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (ACMC) हा अभ्यासक्रम पार पडला. वैद्यकीय शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास, आधुनिक मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रम नियोजन, शैक्षणिक नेतृत्व आणि संशोधन क्षमतांचा विकास या उद्देशाने हा अभ्यासक्रम राबविण्यात आला.
या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. शुभांगी घुले-वाघ, डॉ. निलेश बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी यशस्वी सहभाग नोंदवत अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच डॉ. देवेंद्र चौधरी यांनीही या प्रतिष्ठित अभ्यासक्रमाची सुरुवात केली असून त्यांच्या सहभागामुळे संस्थेतील प्रशिक्षित वैद्यकीय शिक्षकांची संख्या आणखी वाढणार आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी मेडिकल एज्युकेशन युनिटमार्फत भविष्यातही विविध प्राध्यापक विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. आधुनिक अध्यापन तंत्र, प्रभावी मूल्यमापन आणि संशोधनाभिमुख शिक्षण यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी अभिनंदन केले. भविष्यातही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षणातील गुणवत्ता, आधुनिक अध्यापन पद्धती आणि प्रशिक्षित प्राध्यापकांची संख्या वाढविण्याच्या दिशेने हे यश महत्त्वाचे मानले जात असून, याचा थेट लाभ वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि आरोग्य शिक्षणाच्या गुणवत्तेला होणार आहे.



