


चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाला रंगेहाथ पकडले आहे. पांढरी शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन तसेच इतर साहित्य असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अडावद पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून समाधान अशोक कोळी (वय २९, रा. दुर्गा चौक, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई २७ जून २०२६ रोजी सायंकाळी पांढरी शिवारातील जीवन कोळी यांच्या शेताजवळील पांढरी नाल्याच्या काठी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अडावद पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी समाधान कोळी हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपी हा दारू तयार करताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ८४ हजार रुपये किमतीचे सात प्लास्टिकचे २०० लिटर क्षमतेचे ड्रम, त्यामध्ये असलेले कच्चे रसायन, तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. याशिवाय सुमारे ३ हजार रुपये किमतीची दगडी-लाकडी पेटी, लोखंडी पत्रे आणि अंदाजे ३० लिटर उकळते रसायन, तसेच २ हजार रुपये किमतीची तयार गावठी हातभट्टी दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी समाधान कोळी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार किरण शिरसाठ, पोलीस शिपाई सुनिल तायडे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण शिरसाठ हे करीत आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अडावद पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



