पातोंडा, ता.अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या सावखेडा नाक्यावर जळगाव – खरगोन राज्य महामार्गावर बंद स्थितीत असलेल्या टोल नाक्याचे बांधकाम अपघाताला निमंत्रण देणारे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ते बांधकाम तात्काळ हटविण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व नागरिकांमधून होताना दिसत आहे.
सावखेडा नाक्यापासून एक मार्ग जळगाव, एक मार्ग धुळे व एक मार्ग चोपडाकडे जातो. सदर राज्य महामार्ग मध्यप्रदेशाला जोडणाऱ्या वाहतुकीसाठी सोयीस्कर मार्ग असून जळगाव व धुळेकडून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होत असते; म्हणून सदर राज्य महामार्ग वर्दळीचा असतो. मागील काळात राज्य शासनाचा सदर नाक्याच्या काही अंतरावर टोलनाका सुरू झाला होता. त्याठिकाणी टोल वसुलीचे कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची इमारत बांधली गेलेली आहे. परंतु काही वर्षानंतर सदर टोलनाका शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला. मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेले टोल वसुलीचे कार्यालय आजही बंद अवस्थेत जैसे थे आहे.
दरम्यान वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असल्याने मध्यभागी असलेल्या त्या टोल वसुलीच्या कार्यालयामुळे वाहनांना समोरील वाहने दिसून येत नाहीत. काही वाहने ओव्हरटेकच्या नादात थेट वाहने सुसाट जातात. त्याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने कधीकधी समोरासमोर येऊन धडकतात. म्हणून सदरचे बांधकाम हे अपघाताला निमंत्रण देणारे असून ते धोकेदायक आहे. टोल नाका बंदच झाला असल्याने ते बांधकाम निरुपयोगी असून सदरचे बांधकाम काढून रस्ता सुरळीत करण्यात यावा,जेणेकरून अपघाताचा धोका टळेल म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन टोल वसुली कार्यालयाचे बांधकाम हटविण्याची मागणी प्रवासीवर्ग, वाहुतकधार व नागरिकांकडून होत आहे.