जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम २०२५-२६ साठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता नियोजनबद्ध पद्धतीने खतांची खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये डीएपी (DAP), एमओपी (MOP), युरिया (Urea), एसएसपी (SSP), एनपीकेएस (NPKS) आणि एफओएम (FOM) अशा प्रमुख खतप्रकारांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तालुकानिहाय विचार केल्यास, जामनेर तालुक्यात सर्वाधिक १४,२९९ मेट्रिक टन खतसाठा असून, हा जिल्ह्यातील सर्वाधिक साठा आहे. त्यानंतर रावेर तालुक्यात ८,८६७ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे, तर भडगाव तालुक्यात सर्वात कमी, म्हणजे १,९७५ मेट्रिक टन साठा आहे.
प्रमुख खतप्रकारांचा उपलब्ध साठा (मेट्रिक टनमध्ये):
DAP: १३१७.५, MOP: ७३५५.४९, Urea: १८,९८८.१७, SSP: ३५,२८९.२५, NPKS: ३४,४४५.७२, FOM (सेंद्रिय खत): ८७.२९
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग खतसाठ्याच्या नियोजनासाठी पूर्णपणे सतर्क असून, शेतकऱ्यांच्या शेतीसमृद्धीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता, आपल्या गरजेनुसार योग्य वेळी खतांची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे खतांच्या कृत्रिम तुटवड्याला आळा बसेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळतील अशी अपेक्षा आहे.