जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानाजवळ उसनवारीने घेतलेले पैशांवरून एका तरूणाला दोन जणांनी हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल एकनाथ येरापले वय २५ रा. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण शनिवारी ३० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानाजवळ उभा होता. त्यावेळी बाळा सोनवणे आणि प्रतीक सोनवणे दोन्ही रा. जळगाव हे कुणालजवळ आले. त्यांनी उसनवारीने कुणालला दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात कुणालला बेदम मारहाण केली. त्याला लोखंडी कड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या कुणालवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी ३१ मार्च रोजी सायकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.त्यानुसार संशयित आरोपी बाळा सोनवणे आणि प्रतीक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.