निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष

vidhansabha5

 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता विविध राजकीय पक्षांना/उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या/परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

निवडणूकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांना/उमेदवरांना परवानग्या/परवाने प्राप्त करुन घेण्यासाठी वेगवेगळया कार्यालयाकडे जावे लागते. यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा आणि सदरील परवानग्या/परवाने तात्काळ प्राप्त व्हावे. याकरीता एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रचारासाठी विविध परवाने देणेसाठी जिल्हा निवडणुक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

एक खिडकी कक्षामध्ये परवानग्या/परवाने देणारे अधिकारी व परवानगीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत

 

चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिरसभा घेणेकरीता संबधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून याकरीता परवानगी मिळणेबाबतचा अर्ज, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायत/नगरपालिका/ महापालिकेचा नाहरकत दाखला असणे आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स/झेंडे लावणे याकरीता उपआयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी नगर परिषद/ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची परवानगी घेणे आवश्यक असून याकरीता अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, नगरपालिका/ महापालिकेचा/ग्रामसेवकाचा नाहरकत दाखला. खाजगी जागेवर जाहिरात फलक (कटआऊट वगळून) लावणे याकरीता उपआयुक्त महानगरपालिका/ मुख्याधिकारी नगर परिषद/ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, फलक लावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे.

प्रचार वाहन परवानगी एक पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्राकरीता परवानगी पाहिजे असल्यास त्या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी/अपर जिल्हादंडाधिकारी/निवासी उप जिल्हाधिकारी, जळगाव यांची तर फक्त विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रासाठी संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, वाहनमालकाचे संमतीपत्र, वाहन नोंदणीपत्र, वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनाचे वैध वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालकाचा वैध परवाना आवश्यक आहे.

 

प्रचार कार्यालयांची परवानगी घेणेकरीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, नगरपालिका/ महानगरपालिका / ग्रामसेवकाचा नाहरकत दाखला आवश्यक आहे.

 

हेलीपॅडवर हेलिकॉप्टर उतरविणेकरीता संचालक, नागरी विमान सेवा यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, जिल्हाधिकारी /पोलिस अधिक्षक/कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपालिकेचा/ महापालिकेचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकाची परवानगी करीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, वाहन चालकाचा वैध परवाना आवश्क आहे. मिरवणुक/रोड शो/रॅली करीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, मिरवणुक/ रोड शो/ रॅलीचे ठिकाण नमुद करणे आवश्यक आहे.

 

केबल जाहिरात परवानगी करीता जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून नमुना अ मध्ये अर्ज, जाहिरात मजकुर स्वरुपात अथवा ध्वनी मुद्रीत/रेकॉडींग सी डी स्वरुपात असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर परवानगी देणेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे. याप्रकारचे परवाने मिळण्यासाठी उमेदवार/राजकीय पक्ष यांनी त्यांचे अर्ज सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वा वेळेत स्वीकारले जातील. उमेदवार अथवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी वरील सक्षम अधिका-यांकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांना तात्काळ परवानगी दिली जाईल.

 

उमेदवार व राजकीय पक्ष यांना ग्रामपंचायत/नगरपरिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र त्याचठिकाणी उपलब्ध होण्याकरीता संबंधीत पंचायत समितीचा एक विस्तार अधिकारी आणि नगरपालिकेचा जबाबदार प्रतिनिधी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दररोज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत उपलब्ध राहून याचठिकाणी नाहरकत प्रमाणपत्र उमेदवार/त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांना उपलब्ध करुन देणार आहे.

 

त्याचबरोबर जळगाव शहर महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक जबाबदार अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरीता व वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याकरीता एक जबाबदार अधिकारी, तर पोलिस अधिक्षक, जळगाव यांचे अधिनस्त एक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी जळगाव शहरातील परवान्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव येथील एक खिडकी कक्षात प्रतिनियुक्ती करण्याचे निर्देशही डॉ. ढाकणे यांनी संबंधितांना दिले आहेत.

 

हे सर्व अधिकारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उमेदवार/त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयातच संबंधीत परवाने देणार आहेत. त्याचबरोबर सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातही याप्रमाणे एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे डाॅ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.

Protected Content