जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अभिलेख्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या असून अशा विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यात, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांद्वारे तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणीत बियाणे, खत व किटकनाशके विक्री परवान्याची तपासणी, साठा व भाव फलकदर्शनी भागात लावणे, साठा व विक्री रजिस्टर अद्यावत ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या सर्व निविष्ठांचा स्त्रोतांचा समावेश परवान्यात करणे, बिल बुक, मुदतबाह्य साठा, कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक प्रदर्शित करणे, गोदामातील खतसाठा तपासणी तसेच मासिक विक्री अहवाल सादर करणे आदि बाबींची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी याप्रमाणे सर्व अभिलेख अद्यावत ठेवावे. जे केंद्र चालक शेतकरी बांधवांना जादा दराने/अनधिकृत/बोगस कृषि निविष्ठांची विक्री करताना आढळतील तसेच त्यांचे अभिलेख अद्यावत नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असेही श्री. ठाकूर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Protected Content