मुंबईत शिवसेना — भाजप कार्यकर्त्यांची हाणामारी

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली आहे.

 

राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले

 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.

 

 

लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली.

 

अयोध्येत जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे आरोप व त्याबाबतची कागदपत्रे समोर आली आहे. अशाप्रकारचा घोटाळा हिंदूंसाठी संतापजनक असून या प्रकरणाबाबत संस्थेबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदनेही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Protected Content