विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत संवेदनशिलता शिकविणे गरजेचे – भालेराव

जळगाव प्रतिनिधी । जगात भारताचा महासत्ता म्हणून उदय होईलच. त्यासाठी शिक्षण प्रणालीतील विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत संवेदनशिलता, प्रामाणिकपणा शिकविणे गरजेचे आहे. ही मोठी जवाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अ.फ.भालेराव यांनी केले.

राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा गौरव समारंभ दर्जी फाउंडेशनच्या सभागृहात झाला. यात संस्थेतर्फे शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अ.फ.भालेराव बोलत होते. व्यासपीठावर श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडाळकर, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश वाघ, लोककलावंत गणेश अमृतकर, कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांची मेहनत अधिक 

मातृ किंवा पितृ छत्र हरवलेल्या गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व राजनंदिनी संस्थेतर्फे स्वीकारण्यात आले आहे. या उपक्रमातून अनेक वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी शिक्षकांचाही हातभार लागणे गरजेचे आहे, असे मत शिक्षक प्रशांतराज तायडे (कर्की, ता.मुक्ताईनगर) यांनी व्यक्त केले. विद्यार्थी घडविण्यात प्राथमिक शिक्षकांची अधिक मेहनत असते. पूर्वी शिक्षकांची आदरयुक्त भीती होती. परंतु, आता ही आदरयुक्त भीती कमी होताना दिसते. आदर्श विद्यार्थी, उद्याचा नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी तन, मनाने काम करणे गरजेचे आहे, असे मत प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी व्यक्त केले. या पुरस्कारामुळे शिक्षकांची जवाबदारी अधिक वाढली आहे, असे सुरेश वाघ यांनी सांगितले.

दातृत्त्व भाव महत्वाचा 

काही कारणास्तव ज्या मुला-मुलींचे शिक्षण अडचणीत आले असेल, त्यांना समाजाच्या माध्यमातून शैक्षणिक मदत करण्यावर संस्थेचा भर आहे. हा दातृत्त्व भाव वाखाणण्यासारखा आहे, असे मत मीनाक्षी चव्हाण यांनी व्यक्त केले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध गायिका रजनी पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पवार यांनी सुमधूर गीत गायन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर वाघ आणि सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले. या समारंभासाठी ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, श्री राजपूत करणी सेनचे खान्देश विभाग अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!