उसनवारीच्या पैशांवरून दुकानदारासह त्यांच्या मुलीला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांडे चौकातील पांडे डेअरी येथे उसनवारीच्या पैशांवरून दुकानदारासह त्यांच्या मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करत मुलीच्या हातातील मोबाईल फोडून नुकसान केल्याची घटना मंगळवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी १० जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पांडे चौकात मुकेश सुभाषचंद्र पांडे याचे पांडे डेअरी नावाचे दुकान आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी दीड वाजता मुकेश पांडे हे दुकानावर बसलेले असतांना पप्पु सोनवणे व त्यांचे अनोळखी तीन सहकारी हे दुकानावर आले. त्यांनी उसनवारीच्या पैशांवरून मुकेश पांडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर पप्पु सानेवणे याने लाकडी दांडक्याने मुकेश पांडे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पांडे यांची मुलगी मोक्षदा पांडे ही मारहाण करत असतांना व्हिडीओ काढत होती. या रागातून चौघांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून जमीनीवर फेकून नुकसान केले आणि तिला मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर मुकेश पांडे यांचा मुलगा प्रतिक पांडे याने बुधवारी १० जुलै रोजी रात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा पप्पू सोनवणे आणि त्याचे सोबत असलेल्या अनोळखी तीन जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल भारती देशमुख हे करीत आहे.

Protected Content