ब्रेकिंग:ज्वेलर्स दुकान फोडून तिजोरी तोडण्याचा प्रयत्न ; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. या प्रयत्नात एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नवीपेठेत हेमंत रुंगठा, त्रिलोक रुंगठा यांचे १९५८ पासून असलेले जुने लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाने दुकान असून या दुकानात दागिने घडविण्याचे काम केले जाते. हेमंत रूंगठा गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेपर्यंत उपस्थित होता. त्याने दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री १ वाजून ५३ मिनिटाला एक चोरटा हा दुकानात आला. त्याने दुकानाची पट्टी तोडून आत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिजोरी या चोरट्याकडून न खुलल्याने त्याने चांदीचे काही तुकडे घेऊन सीसीटीव्हीच्या वायरी कापून पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांसह श्वान पथकाने भेट दिली असता श्वानाने टॉवर पर्यंत रस्ता दाखविला. दरम्यान या परिसरात युको बँक, सारस्वत बँक , डीएनएस बँक सारख्या नामांकित बँका असतानाही या ठिकाणी असुरक्षित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने पाहणी केले. तसेच यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान या घटनेबाबत उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेशिवाय इतर नामांकित खासगी बँका असल्याने आणि या गल्लीत नामांकित प्रतिष्ठाने असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा येथील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

Protected Content