“रस्ता” विचारला अन् अट्टल वाहन चोर पकडला गेला; अमळनेर पोलीसांची कारवाई


अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अमळनेर पोलिसांना अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या शिरपूर तालुक्यातील म्हळसर येथील अट्टल दुचाकी चोरटा भैय्या उर्फ तुषार शालिग्राम वाकडे (कोळी) याला अखेर शिताफीने अटक केली आहे. चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी “पत्ता विचारण्याचा” अनोखा बहाणा वापरला. त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील वावडे येथील कमलाकर लोटन पाटील यांची (एमएच १९ डीडब्लू २३९२) क्रमांकाची मोटरसायकल १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता चोरी झाली होती. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि. दत्तात्रय निकम यांनी पथकाला कारवाई करून आरोपीला अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तुषार वाकडे याने ही दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

संशयित आरोपी तुषार वाकडे हा पोलिसांना सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र, तो गावात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचला. तुषार शेताजवळ रस्त्यावर उभा असताना, पोलिसांनी त्याला “कपिलेश्वरचा रस्ता कुठून जातो?” असे विचारले. तो बोलत असतानाच, पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीवर इतर ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.