जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र’च्या वतीने जळगाव येथे आरटीओ कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जळगाव शहर आणि आसपासच्या गावांमध्ये सुरू होणाऱ्या पीएम ई-बस सेवेमुळे ऑटो रिक्षा चालकांच्या रोजगारावर होणाऱ्या नकारात्मक परिणामावर यावेळी तीव्र आक्षेप घेण्यात आला. यासोबतच, ई-बाईक टॅक्सीचे खुले परवाने तातडीने बंद करण्याचीही प्रमुख मागणी करण्यात आली.
या आंदोलनातून ऑटो रिक्षा चालकांनी पीएम ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ऑटो रिक्षा चालकांचे जीवनमान अधिक कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच राज्यात ऑटो रिक्षांचे खुले परवाने देणे तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी केली. खुले परवाने सुरू असल्याने व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ई-रिक्षांच्या वाढत्या सुळसुळाटावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. ई-रिक्षा वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, ओव्हरसिटिंग करतात आणि ठरवून दिलेल्या मार्गांवरून न चालता मनमानी करतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आणि आधीच संकटात असलेल्या ऑटो रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. ई-रिक्षांनाही प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम लागू करावेत आणि त्यांना परवाना बंधनकारक करावा अशी मागणी त्यांनी केली.
केंद्र सरकारद्वारे जळगाव शहर व आसपासच्या गावांमध्ये सुरू होणाऱ्या पीएम ई-बस सेवेमुळे ऑटो रिक्षा चालकांच्या रोजगारावर मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याने, हा निर्णय मागे घेण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्तांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने ऑटो रिक्षा चालक-मालक उपस्थित होते. आंदोलकांनी परिवहन विभागाला निवेदन देऊन आपल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.