जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा एप्रिल महिन्याचा पगार रखडल्याने शिक्षकांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शासनाने वेतनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असतानाही पगार न मिळाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती. या संदर्भात जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने कोषागार कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.
मार्च महिन्यातील प्रलंबित बिलांची अडचण होती, ती आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात आली होती. तरीही एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत पुढील कार्यवाही होत नसल्याने, आज जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सर्व संघटनांच्या वतीने कोषागार अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारले.
आंदोलक शिक्षकांनी कोषागार अधिकारी खैरनार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर खैरनार यांनी एका तासात पगार खात्यावर जमा होतील असे आश्वासन दिले. शिक्षकांनी पगार खात्यावर जमा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रखडलेल्या पगारांमुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे पगार तात्काळ जमा होणे गरजेचे होते.