पिकअपच्या धडकेत आजोबा जागीच ठार, नातू गंभीर जखमी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहावीची गुणपत्रिका घेण्यासाठी नातवाला घेऊन शाळेत निघालेल्या आजोबांवर काळाने घाला घातला. यावल तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ पिकअप वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सुभाष बाबुराव पाटील (वय ७०) या आजोबांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा १६ वर्षीय नातू कल्पेश उत्तम पाटील गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. कल्पेशवर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव येथील रहिवासी असलेले सुभाष पाटील हे आपल्या नातू कल्पेशला चिंचोली येथील विद्यालयात दहावीचा निकाल आणि गुणपत्रिका घेण्यासाठी एम. एच. ०४ बी. एक्स. ४५६८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर एम. एच. ०४ के.एफ. ८४४० क्रमांकाच्या पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुभाष पाटील यांचा जागीच अंत झाला, तर कल्पेशला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावल पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख आणि हवालदार संदिप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. गंभीर जखमी कल्पेशला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले, तर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

सुभाष पाटील यांचे भाऊ वासुदेव बाबुराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पिकअप वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख पुढील तपास करत आहेत.