यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती अंतर्गत बोराळे मालोद येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले राजु अनवर तडवी यांचे २० मे रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे.
राजु तडवी हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करत होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कर्तव्यनिष्ठतेमुळे त्यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रशासकीय सेवा काळात त्यांनी प्रत्येक काम निष्ठापूर्वक पार पाडले.
राजु तडवी यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे सहकारी आणि यावल पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. २१ मे रोजी सकाळी नऊ वाजता सावदा येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. राजु तडवी यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.