Home क्राईम भुसावळात पोलिसांचे मध्यरात्रीनंतर धडक ‘कोबिंग ऑपरेशन’

भुसावळात पोलिसांचे मध्यरात्रीनंतर धडक ‘कोबिंग ऑपरेशन’

0
7


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना कायमचा आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली १० जून रोजी भुसावळ उपविभागात पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात धडक ‘कोबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या धडक मोहिमेमुळे भुसावळ शहर आणि परिसरातील सराईत गुन्हेगार, तडीपार आणि अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा राबता पाहायला मिळाला.

या धडक कारवाई दरम्यान भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे शरीराविरुद्ध व मालाच्या विरुद्ध गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात आला. तसेच शहरातील पाहीजे असलेले आरोपी, फरार गुन्हेगार आणि तडीपार आरोपींच्या संभाव्य अड्ड्यांवर व घरांवर एकाच वेळी छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली. या मोहिमेत भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन, मुख्य बस स्थानक आणि विविध लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांनी एकूण ६३ संशयितांच्या घरांची झडती घेतली, ज्यामध्ये ९९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासून ताब्यात घेण्यात आले. तसेच ११२ संशयित वाहनांची तपासणी करून त्यापैकी २३ वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त करण्यात आली असून ५४ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची देखील झाडाझडती घेण्यात आली.

कोबिंग ऑपरेशन दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत काही संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली. यात दिनदयाल नगर येथील रहिवासी समीर शहा जब्बार शहा याच्याकडून १ गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तसेच शम्मी प्रल्हाद चावरिया आणि दानिश शेख अकील यांच्याकडून प्रत्येकी १ तलवार, तर केवल अनिल टाक याच्याकडून १ धारदार कोयता (चॉपर) हस्तगत करण्यात आला. या चारही आरोपींना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट (शस्त्र अधिनियम) अंतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, जळगाव जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आलेला आरोपी संदीप बुधा खंडारे हा पोलिसांची परवानगी न घेता शहरात फिरताना रंगेहात पकडला गेला, त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी भुसावळच्या मच्छी मार्केट परिसरातून २५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा ॲक्टिव्हा मोटरसायकल (क्रमांक MH 18 BW 6155) जप्त केली. ही दुचाकी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून (गु.र.नं. 84/2026 BNS 303(2)) चोरीला गेली होती, ती पुढील तपासासाठी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळा बुद्रुक या गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या ३ अड्ड्यांवर छापे टाकून १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरीकडे, लोहमार्ग पोलीस ठाणे (खंडवा, मध्य प्रदेश) कडील अटक वॉरंटमधील फरार आरोपी सल्तनत अली इराणी (रा. पापानगर, भुसावळ) यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला खंडवा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

या भव्य आणि नियोजनबद्ध मोहिमेत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे राहुल वाघ, तालुका पोलीस ठाण्याचे महेश गायकवाड, मुक्ताईनगरचे आशिष अडसूळ, आणि बोदवडचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्यासह तब्बल २० प्रभारी व दुय्यम अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे ४५ अंमलदार, जणगाव परिमंडळातील १११ पोलीस अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे २७ अंमलदार आणि १५ महिला अंमलदार अशा मोठ्या फौजफाट्याने या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भुसावळ उपविभागातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound