चालत्या लक्झरी बसने पेट घेतला; मोठी जीवितहानी टळली !


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे येथून बऱ्हाणपूरमार्गे धारणीकडे जात असलेल्या एका खासगी लक्झरी बसला मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पाळधीजवळच्या पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक आग लागली. बसचे टायर तापल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व ३० ते ३५ प्रवाशांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमपी ४८ झेडएफ ५५३३) या क्रमांकाची बस पुणे-औरंगाबाद मार्गे जात असताना पिंपळगाव गोलाईत गावाजवळ पोहोचल्यावर तिच्या मागील टायरने पेट घेतला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने तातडीने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना आपल्या सामानासह खाली उतरवले. थोड्याच वेळात संपूर्ण बसने पेट घेतला. यावेळी जोरदार वारा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते, ज्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली.

ग्रामस्थांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली असता, अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर शेंदुर्णी येथील अग्निशमन दलाची गाडीही मदतीसाठी दाखल झाली. बसमध्ये महिला, मुले, तरुण आणि काही वृद्ध व्यक्तींसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे पहूर-जामनेर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.