सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी २१ जून २०२५ रोजी शनिवार, अंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने निष्कलंकधाम, वढोदे (फैजपूर) येथे सत्पंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या वतीने सामूहिक योगाभ्यासाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत होणाऱ्या या योगाभ्यास कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिकता व आरोग्याच्या जागृतीस नवे आयाम लाभणार आहेत.
या विशेष योग दिनाच्या निमित्ताने महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचे सान्निध्य कार्यक्रमाला लाभणार आहे, हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन आचार्य सचिन जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, शिस्तबद्ध योग क्रियांचे मार्गदर्शन तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे.
निष्कलंकधाममधील तुलसी हेल्थ केअर सेंटर हे योग व प्राकृतिक उपचारासाठी प्रसिद्ध ठिकाण असून, या परिसराने आधीच आरोग्यसंपन्नतेची दिशा दाखवलेली आहे. निसर्गोपचार, पंचकर्म, योग व आध्यात्मिक उपचारांचा येथे सुंदर संगम घडतो. या पार्श्वभूमीवर योगदिनाच्या निमित्ताने आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाने नागरिकांमध्ये शरीर-मन-आत्मा यामधील समतोल साधण्याचा एक नवा मार्ग सुचवला आहे.
आरोग्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी या सामूहिक योगाभ्यासाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्पंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही योगदिनाची उत्सवमूर्ती एक प्रेरणादायी पर्व ठरेल, यात शंका नाही.