सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहराच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जगमाता परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी सावदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत थेट ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे.
शेतमजुरांच्या कामावर परिणाम :
जगमाता परिसरात वास्तव्यास असलेला बहुतांश वर्ग हा शेतमजूर आणि हातावर पोट असणारा मजूर वर्ग आहे. या नागरिकांना सकाळी लवकर कामावर जावे लागते. मात्र, पाणीपुरवठा अनियमित वेळेत आणि अत्यंत कमी दाबाने होत असल्याने मजुरांना पाण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर आणि दैनंदिन जीवनावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोटारधारकांमुळे गरिबांची कोंडी :
परिसरातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. ज्यांच्याकडे मोटारपंप नाही, अशा नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या भागात मोटारपंप वापरणाऱ्यांमुळे इतरांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळी मोटारी बंद ठेवण्याचे आदेश देऊन सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांचा इशारा :
स्थानिक नगरसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी यापूर्वी परिसराची पाहणी केली, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जर नगरपालिकेने तातडीने अतिरिक्त टँकरची व्यवस्था केली नाही आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवली नाही, तर परिसरातील महिलांच्या वतीने नगरपालिकेवर भव्य हंडा मोर्चा काढला जाईल,” असा खणखणीत इशारा रहिवाशांनी दिला आहे. याप्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आता सावदा नगरपालिका यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



