जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गरिबी, अठराविश्वे दारिद्र्य आणि परिस्थितीचे चटके सोसत जळगाव शहर व परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील १४ विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. ‘सुधर्मा’ संस्थेच्या शैक्षणिक पाठबळामुळे या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
कचरा वेचणाऱ्या हातांची मोठी झेप
मेहरूण परिसरातील भिलवाडी येथील पाच मुलींचे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. यामध्ये प्रतिभा ज्ञानेश्वर बोरसे या विद्यार्थिनीने ६२% गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. प्रतिभाला केवळ आई असून ती आईसोबत कचरा वेचण्याचे काम करते. दिवसभर कष्ट करूनही तिने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. तिच्यासोबतच रोशनी वेरूळकर (४२%), शालू सोनवणे (४३%), अश्विनी हटकर (४३%) आणि भुरी वाघ (४० टक्के) या मुलींनीही यश मिळवले आहे. या सर्व मुली कचरावेचक पालकांच्या असून सुधर्मा संस्थेने त्यांना पुस्तके, दप्तर, गाईड आणि सायकल देऊन शिक्षणाची वाट सोपी केली.

स्वप्न आयटी इंजिनिअर होण्याचे!
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नांची मोठी भरारी दिसून येत आहे. प्रतीक्षा नावाच्या विद्यार्थिनीला पुढे शिकून ‘आयटी इंजिनिअर’ व्हायचे आहे. यासोबतच खेडी खुर्द येथील चंदन वरणकर (६० टक्के), मयुर पाटील (७०टक्के), वर्षा खंगार (४९टक्के), गौरव तायडे (४०टक्के) आणि मन्यारखेडा येथील जान्हवी पाटील (६०टक्के), उमेश पाटील (५०टक्के) या दहावीच्या विद्यार्थ्यांनीही उत्तम यश मिळवले.
बारावीतही सुधर्माच्या विद्यार्थ्यांचा डंका
केवळ दहावीच नव्हे, तर बारावीच्या परीक्षेतही सुधर्माच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये अंतरा झोडपे (७२टक्के), रोशनी चव्हाण (६०टक्के) आणि प्रेम पवार (६२टक्के) या विद्यार्थ्यांनी गरिबीला आडवे येऊ न देता यश खेचून आणले. सुधर्मा संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे जळगाव शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.



