Home Cities जळगाव अचानक धाड! CEO करिश्मा नायर यांचा तळई आरोग्य केंद्रावर छापा; सुविधा, औषधसाठा...

अचानक धाड! CEO करिश्मा नायर यांचा तळई आरोग्य केंद्रावर छापा; सुविधा, औषधसाठा आणि स्वच्छतेची घेतली झाडाझडती

0
7

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नसल्याचा स्पष्ट संदेश देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवारी (१४ जुलै) एरंडोल तालुक्यातील तळई प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य यंत्रणेची कसून तपासणी केली. या अचानक पाहणीमुळे आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा, औषधसाठा, स्वच्छता, उपचार व्यवस्था तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची बारकाईने पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर, दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा देणे ही यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत रुग्णांची कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधा सतत कार्यान्वित ठेवण्याचे त्यांनी आदेश दिले.

औषधसाठ्याची तपासणी करताना जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णालय परिसर, उपचार कक्ष, प्रतीक्षालय आणि इतर विभागांची नियमित स्वच्छता राखण्यावर विशेष भर देत निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि तापासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले. गावपातळीवरील जनजागृती, घराघरांत सर्वेक्षण, संशयित रुग्णांचे तातडीने निदान आणि उपचार यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


Protected Content

Play sound