सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या वतीने सावदा येथे १० मे रोजी भव्य आदिवासी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यंदा या उपक्रमाचे २९ वे वर्ष पूर्ण होत आहे. रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कष्टकरी आणि गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरत आहे.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना गेल्या २८ वर्षांपासून अखंडितपणे आदिवासी समाजातील गरीब, निराधार आणि गरजू वधू-वरांचे विवाह निःस्वार्थ भावनेतून लावून देत आहे. या कालावधीत तब्बल १८५० जोडपी विवाहबद्ध झाली असून, या कार्यामागे कोणतीही अपेक्षा नसून सामाजिक बांधिलकी आणि समाज उन्नतीचा ध्यास असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाढता विवाह खर्च, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता सामूहिक विवाह सोहळा अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे.

या सोहळ्याच्या माध्यमातून केवळ विवाहच नव्हे, तर समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव केला जातो. सामाजिक, शैक्षणिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गुणवंत गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि युवती यांचाही मान-सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि प्रेरणादायी कार्याचा उत्सव ठरत आहे.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना समाजहितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहे. शिक्षण, सामाजिक प्रबोधन, युवक मार्गदर्शन आणि समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचे हात पुढे करण्याचे कार्य संघटना सातत्याने करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
१० मे रोजी होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त गरजू वधू-वरांनी सहभागी व्हावे, विवाह नोंदणी करून अनाठायी खर्च आणि वेळेची बचत करावी, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू तडवी, प्रदेशाध्यक्ष कामील तडवी, अनिल तडवी, इरफान तडवी यांच्यासह आसेमं महापरिवारातर्फे करण्यात आले आहे.
या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी राहणार आहेत. तसेच फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, अनिल चौधरी, राजेश वानखेडे, सपोनि विशाल पुंडलिक पाटील, नगराध्यक्ष रेणुका पाटील, शेख हारुण सेठ, उपनगराध्यक्ष फिरोज खान, धनंजय चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



