भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते वाडे मार्गावरील एसटीच्या तीन महत्त्वाच्या बस फेर्या अचानक बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत असून, या बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी पत्रकार अशोकबापू परदेशी यांनी प्रवाशांसह भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या उपोषणामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून ग्रामीण भागातील नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
पाचोरा आगाराकडून दि. १३ एप्रिल २०२६ पासून भडगाव ते वाडे मुक्कामी बस, सकाळी ८.३० वाजताची बस तसेच सायंकाळी ४.४५ वाजताची बस अशा एकूण तीन बस फेर्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे वाडे, टेकवाडे खुर्द, नावरे, बांबरुड प्र. ब., गोंडगाव, दलवाडे, लोणपिराचे, बोरनार, सावदे, घुसर्डी खुर्द, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, वढधे आणि भडगाव परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रोजंदारीवर कामासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी सेवा ही जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे या सेवा बंद झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात पत्रकार अशोकबापू परदेशी यांनी दि. २ मे २०२६ रोजी भडगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक, पाचोरा आगार प्रमुख तसेच भडगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत बस फेर्या तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र जवळपास २४ ते २५ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर पुन्हा दि. ७ मे २०२६ रोजी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देत दि. ९ मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या आंदोलनास विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, प्रवासी संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दिला असून लोणपिराचे व कोठली ग्रामपंचायतीमार्फतही एसटी प्रशासनाला बस सेवा सुरू करण्याबाबत लेखी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी दिवसभर विविध गावांतील नागरिक, प्रवासी व सामाजिक कार्यकर्ते भेट देत असून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन बंद बस फेर्या पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.



