मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, समालोचक आणि ब्रॉडकास्टरसाठी काम करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंवर आता सोशल मीडियावरील कंटेंट पोस्ट करण्याबाबत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा कारणास्तव नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने यंदाच्या हंगामात अनेक नियमभंगाची प्रकरणे समोर आल्याचे स्पष्ट केले आहे. काही खेळाडू आणि माजी क्रिकेटपटू मैदानातील तसेच डगआउटमधील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे निदर्शनास आले. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सामन्यादरम्यान किंवा संवेदनशील ठिकाणी रील्स, व्हिडिओ किंवा अन्य प्रकारचा कंटेंट तयार करणे पूर्णपणे प्रतिबंधित राहील.

मीडिया रिपोर्टनुसार, एका माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी डगआउटजवळ मोबाईलवर व्हिडिओ शूट करताना आढळले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला थांबवले. तसेच, मैदानावर अधिकृत आयपीएल ड्रेस परिधान करून वैयक्तिक यूट्यूब चॅनलसाठी शूटिंग करणाऱ्या आणखी एका माजी क्रिकेटपटूला कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयला विशेषतः नव्या पिढीतील क्रिकेटपटूंच्या वाढत्या ‘रील संस्कृती’ची चिंता आहे. काही खेळाडू संघाचा प्रवास, हॉटेलमधील हालचाली किंवा सामना सुरू होण्यापूर्वीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे संघाची गोपनीय माहिती बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो. काही वेळा अशा व्हिडिओंमधून प्लेइंग-11 किंवा संघाच्या रणनीतीबाबत संकेत मिळण्याची शक्यता असल्याचेही बोर्डाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करण्याबाबत सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी एका भारतीय वेगवान गोलंदाजाला त्याच्या पत्नीने टीम हॉटेलमधून बनवलेल्या व्हिडिओला प्रोत्साहन दिल्यामुळे ताकीद देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
फ्रँचायझींनी संघासोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना दिलेल्या ‘अनफिल्टर्ड अॅक्सेस’वरही बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या मते, अशा प्रकारामुळे भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढते आणि सुरक्षा व्यवस्थेवरही परिणाम होतो.
दरम्यान, काही वरिष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू कुटुंबीय किंवा मित्रांना टीम बसमध्ये प्रवास करू देत असल्याबाबतही एसीयूने आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, टीम बस, हॉटेलमधील प्रतिबंधित विभाग आणि संघाशी संबंधित संवेदनशील ठिकाणी केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
विशेष म्हणजे, हेच नियम आता राज्यस्तरीय टी-20 लीग स्पर्धांमध्येही लागू केले जाणार आहेत. बीसीसीआयच्या मते, आयपीएलमधील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने तरुण क्रिकेटपटूंमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
एकूणच, सोशल मीडियावरील वाढत्या सक्रियतेमुळे क्रिकेटमधील सुरक्षा, गोपनीयता आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांपुढे नवीन आव्हाने उभी राहत असल्याने बीसीसीआय आता अधिक कडक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



