Home Cities जळगाव जळगावमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालत ; तडजोडीतून प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आवाहन

जळगावमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालत ; तडजोडीतून प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 09 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, प्रलंबित खटले सामोपचाराने निकाली काढण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे न्यायालयांमध्ये प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांमुळे होणारा आर्थिक खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जळगाव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात ही राष्ट्रीय लोक अदालत पार पडणार आहे. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा वकील संघ यांचे सहकार्य लाभणार असून, न्यायालयीन वाद तडजोडीतून सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळावा यासाठी विविध प्रकारचे प्रकरणे या लोक अदालतीत ठेवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी स्वरूपातील तडजोडयोग्य खटले तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली इतर प्रकरणे निकाली काढण्यासाठी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला दाखलपूर्व प्रकरणांचाही समावेश करण्यात आला असून, न्यायालयीन प्रक्रियेत जाण्यापूर्वीच वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली असून, राष्ट्रीयकृत बँका, खासगी कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या तसेच दूरध्वनी विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये थकीत रकमेवर सवलत देण्याचे प्रस्तावही मांडण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँका आणि कंपन्यांच्या प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वसुली होण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढायची आहेत त्यांनी संबंधित वकीलांसह उपस्थित राहून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे. ऐनवेळी तडजोडीने खटले निकाली काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेले वाद मिटवावेत, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound