रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे हेरून चोरी करण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच शुक्रवारी मध्यरात्री अष्टविनायक नगर परिसरात हत्यारधारी चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात धावत असताना त्यांचा दगडात पाय अडकून पडल्याने उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले.
रावेर शहरातील जुना सावदा रोड, सौभाग्यनगर, तिरुपती नगर, पिपल्स बँक कॉलनी तसेच सावदा रोडवरील विविध कॉलन्या सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे चित्र आहे. मोटारसायकल व पायी फिरून चोरटे बंद घरांची टेहळणी करत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे २.५० वाजेच्या सुमारास एका महिलेला संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी शरद राजपूत यांना संपर्क साधला. राजपूत यांनी तत्काळ त्यांचा मुलगा तसेच शेजारी राहणारे प्रमोद राजपूत, कृष्णा पाटील, नगरपालिकेचे कर्मचारी जतीन आदींना सोबत घेत परिसरात चोरट्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, एका घराच्या कंपाऊंडच्या आत संशयास्पद हालचाल दिसून आल्याने त्यांनी इतर रहिवाशांना आरडाओरड करून सतर्क केले. बॅटरीचा प्रकाश टाकून पाहिले असता चार चोरटे घराच्या सेक्युरिटी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. नागरिकांची चाहूल लागताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
चोरट्यांना पकडण्यासाठी शरद राजपूत यांनी धाव घेतली. मात्र अंधारात धावत असताना दगडात पाय अडकल्याने ते जोरात पडले आणि त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. गंभीर दुखापत होऊनही त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. काही अंतरावर चोरट्यांनी मोटारसायकली उभ्या केल्या होत्या. त्या मोटारसायकलींवर बसून ते सावदा नाका परिसराच्या दिशेने पसार झाले.
शरद राजपूत हे यापूर्वीही धाडसी कृतीमुळे चर्चेत आले होते. बसस्थानक परिसरात बॅग चोरी करून पळणाऱ्या चोरट्याला त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच साई मंदिरात चोरी करताना एका चोरट्याला पकडण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या प्रकरणात तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले होते. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेत तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता.
रावेर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.



