Home Cities जळगाव दिव्यांग युवकांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्णसंधी !

दिव्यांग युवकांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्णसंधी !

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग युवकांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे तसेच जिल्हा परिषद, सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रशिक्षण केंद्रात दिव्यांग युवकांसाठी एक वर्ष कालावधीचे विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) तसेच मोटार अॅन्ड आर्मेचर वायंडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रिक अभ्यासक्रम) यांचा समावेश आहे.

प्रवेशासाठी इच्छुक दिव्यांग युवकांचे वय 16 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. संगणक अभ्यासक्रमासाठी किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण तर इलेक्ट्रिक अभ्यासक्रमासाठी किमान इयत्ता 9 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अद्ययावत संगणक कार्यशाळा, इंटरनेट सुविधा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, अनुभवी व तज्ञ निदेशकांचे मार्गदर्शन तसेच स्वयंरोजगारासाठी समाज कल्याण विभागाच्या विविध बीजभांडवल योजनांचा लाभ मिळणार आहे.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, जि. सांगली – 416410 येथे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज समक्ष किंवा पोस्टाद्वारे विनामूल्य प्राप्त करता येणार आहेत. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रे, सक्षम अधिकाऱ्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड, यूडीआयडी कार्ड, अधिवास प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 0233-2222908, 9922577561 किंवा 9325555981 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, मिरज यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound