


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कोथळी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई निखिल खडसे यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण आरोग्य मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली.
कार्यक्रमाला कोथळीचे उपसरपंच पंकज राणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी तळेले, आरोग्य सहाय्यक श्री. महाजन, विजय पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने पालक व बालकांची उपस्थिती होती. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत मुक्ताईनगर तालुका आरोग्य विभागाने शहरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये विशेष नियोजन केले आहे. पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य देण्याचे आवाहन केले. बालकांच्या निरोगी भविष्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या वतीने “दोन थेंब जीवनाचे, पोलिओमुक्त भारताचे” हा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुक्ताईनगर तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता आरोग्य विभागाने प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बालकांना पोलिओपासून संरक्षण देण्यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.



